७०,००० कोटींचा हिशेब द्या! – अॅड. आशिष शेलार यांचा शिवसेनेवर गंभीर आरोप

७०,००० कोटींचा हिशेब द्या!
मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार अॅड. आशिष शेलार यांचा शिवसेनेवर गंभीर आरोप
पारदर्शीच्या मुद्द्यावर पाठ थोपटून घेणे म्हणजे “मंत्रापेक्षा थुंकी जास्त”
· मुंबई महापालिका जगात ५० व्या क्रमांकावर गेली हेही अहवाल सांगतो आहे, त्याचेही उत्तर द्या

मुंबई, दि. २ फेब्रूवारी
मुंबई महापालिकेच्या अर्थसंकल्पातील २००७ ते २०१२ या वर्षातील सुमारे सत्तर हजार कोटींचा ताळेबंद नाही, हिशेब नाही याचे उत्तर आधी स्थायी समिती अध्यक्ष आणि शिवसेना नेतृत्वाने द्यावे असा घणाघाती आरोप करत पारदर्शी च्या मुद्यावर चुकीचे संदर्भ वापरून स्वतःचीच पाठ खाजवणाऱ्यांचा हा प्रकार म्हणजे मंत्रापेक्षा थुंकी जास्त आहे असा जोरदार प्रतीहल्ला मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार अॅड आशिष शेलार यांनी चढवला.

केंद्र सरकारच्या आर्थिक पाहणी अहवालाचा चुकीचा दखला देऊन आज मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीत केंद्रीय अर्थ मंत्र्यांच्या अभिनंदनाचा ठराव मंजूर करण्यात आला याबाबत बोलताना मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार अॅड आशिष शेलार म्हणाले की, आजपर्यंत अर्थसंकल्पाला विरोध करणारे आता अर्थसंकल्पाच्या बाजूने बोलू लागलेत. हा बदल लक्षवेधी आहे. मुंबईतील जनतेने पारदर्शी कारभाराचा अजेंडा आता स्वीकारला असून त्याला घाबरलेल्यांनी आता चुकीचे संदर्भ वापरून आपली पाठ थोपटून घ्यायला सुरूवात केली आहे. त्यांचे हे स्वतःचीच पाठ खाजवणे म्हणजेच त्यांच्या बालबुद्धीचे लक्षण आहे. मंत्रापेक्षा थुंकी जास्त असाच हा प्रकार आहे असे म्हणावे लागेल. अशा शब्दांत आमदार आशिष शेलार यांनी फटकारले आहे.

ज्या आर्थिक पाहणी अहवालाचा ते दाखला देत आहेत तो पूर्ण न वाचता महापालिकेतील शिवसेना नेते आरडाओरड करत आहेत. या आर्थिक पाहणी अहवालाच्या सुरूवातीलाच अहवालासाठी मागवण्यात आलेली माहिती ही तोकडी व अपूर्ण आहे असे म्हटलेले आहे. त्यामुळे अशा अर्धवट माहितीवर काढण्यात आलेल्या निष्कर्षाचा चुकीचा अर्थ लावून ही पोपटपंची करत आहेत. या अहवालामध्ये केवळ चार निकषांचा विचार करण्यात आला आहे. नळपाणी पुरवठा, मलनिसःरण वाहिनी, सार्वजनिक स्वच्छतागृह, सांडपाण्याचा निचरा या चारच मुद्द्यांचा विचार करण्यात आलेला आहे तर कचरा व्यवस्थापन, वाहतूक व्यवस्था, पाणी, आरोग्य अशा अनेक मुद्यांचा या अहवालात विचार करण्यात आलेला नाही. मग आता आम्ही पुन्हा एकदा प्रश्न उपस्थीत करतो आहोत. ज्या पारदर्शी कारभाराबाबत हे बोलत आहेत त्यांनी नालेसफाईच्या कामातील खाजगी डंपींग ग्राऊंडवर टाकण्यात आलेला गाळ कुठे आहे हे दाखवावे. एकच गाडी एकाच वेळी चार ठिकाणी फेऱ्या मारत होती हे कसे घडले याचे स्पष्टीकरण द्यावे. रस्त्यांची कामे करताना रस्त्यांचा वरचा थर खरडवून काढला का? आणि त्याचे डेब्रीज कुठे टाकले? याचे उत्तरही त्यांनी द्यावे.

सत्तर हजार करोड च्या घोटाळ्याचे हिशेब द्या!
यापुढे जाऊन आमदार अॅड आशिष शेलार यांनी पुन्हा एक गंभीर आरोप सेनेवर केला आहे. सन २००७ ते २०१२ या कालखंडातील २००७ -०८ मधील १२८७७.५२ कोटी, २००८-०९ मधील १६८३१.०९ कोटी, २००९-१० मधील १९७७३.६० कोटी, २०१०-११ मधील २०४१७.३१ कोटी एकूण रू. ६९८९९.५२ कोटी यांचा म्हणजेच सुमारे ७०,००० कोटी रूपयांचा ताळेबंद मांडण्यात आलेला नाही. कुठल्या कंत्राटदाराला बिले देण्यात आली. कोणती कामे करण्यात आली. कुठल्या वांद्रे पूर्व च्या बँकेत पैसे जमा करण्यात आले. या सगळ्याच्या एंन्ट्री झालेल्या नाहीत. या सगळ्याचे उत्तर शिवसेना नेतृत्व आणि विद्यमान स्थायी समितीच्या अध्यक्षांनी द्यावे. अशी मागणी मी आज करतो आणि यापूर्वीही ती केली होती. असा घणाघाती आरोप आमदार अॅड. आशिष शेलार यांनी आज नव्याने केला आहे. ज्या अहवालाचा उल्लेख करून शिवसेना पाठ थोपटून घेत आहे. त्या अहवालामध्ये जगामध्ये मुंबई महानगरपालिका ५० व्या क्रमांकावर गेली. हे का घडले? याचेही उत्तर द्यावे लागेल. असेही ते म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Current day month [email protected] *