सिटीझन फोरम चे नगरसेवक मकरंद नार्वेकर, राष्ट्रवादीचे आसीफ भामला, प्रशांत रेळे, युवासेनेचे स्वप्नील येरूणकर यांचा भाजपात प्रवेश

सिटीझन फोरम चे नगरसेवक मकरंद नार्वेकर, राष्ट्रवादीचे आसीफ भामला, प्रशांत रेळे, युवासेनेचे स्वप्नील येरूणकर यांचा भाजपात प्रवेश

मुंबई भाजपा अध्‍यक्ष आमदार अॅड. आशिष शेलार आणि मंत्री विनोद तावडे यांच्या उपस्थीतीत केला प्रवेश

मुंबई, दि. ३१ जानेवारी

सिटीझन फोरमसाठी काम करणारे ऍक्टिविस्ट म्हणून परिचित असलेले ख्यातनाम वकील आणि विद्यमान नगरसेवक मकरंद नार्वेकर यांच्यासह राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष आणि भामला फाऊंडेशन चे अध्यक्ष असीफ भामला, युवासेनेच्या कोअर कमिटीचे सदस्य स्वप्नील चंद्रकांत येरूणकर, राष्ट्रवादीचे प्रशांत रेळे यांनी आज मुंबई भाजपाचे अध्‍यक्ष आमदार अॅड आशिष शेलार आणि मंत्री विनोद तावडे यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई महापालिका निवडणूकीसाठी पारदर्शी कारभाराचा अजेंडा मांडलेला असून त्याला आता मुंबई शहरात सिटीझन फोरम ने देखील पाठींबा दिला आहे. मुंबई महापालिकेत पारदर्शी कारभाराची गरज असून हा अजेंडा घेऊन काम करणारे भाजपा पक्षाला पाठिंबा दिल्यास जनतेचे हित आहे म्हणूनच मी आणि आमची चळवळ भाजप च्या विचारधारेशी जोडले जात आहोत असे सांगत  सिटिझन कार्पोरेटर म्हणून निवडून आलेले अपक्ष नगरसेवक मकरंद नार्वेकर यांनी भाजपात प्रवेश केला. तसेच प्रोग्रेसिव्ह नॅशनल पार्टी म्हणून आम्ही भाजपाकडे पाहात असून आमच्या विचारधारेला त्यांनी आपल्या विचारधारेशी जोडून घेतले. आम्ही नागरिकांच्या माध्यमातून  उभ्या केलेल्या या चळवळीला भाजप ने ही पाठींबा दिला याचे आम्हाला आनंद होत आहे असे  सांगत नार्वेकर यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. महापालिकेत उत्कृष्ट काम करणारे नगरसेवक, अभ्यासू वकील आणि जगभरात वकीलीचा व्यवसाय करणारे नार्वेकर हे ऍक्टिविस्ट म्हणूनही ज्ञात आहेत. त्यांच्या सोबत त्यांच्या सहकारी  श्रीमती हर्षदा नार्वेकर यांनी ही भाजपा मध्ये प्रवेश केला. त्या हेल्थ केअर कन्सल्टंट असून विविध सामाजिक चळवळींशी जोडलेल्या आहेत. या दोन्ही उच्चविद्या विभूषित व्यक्तींचे स्वागत करताना मला आनंद होत आहे असे मुंबई भाजपाचे अध्‍यक्ष आमदार अॅड आशिष शेलार यांनी स्पष्ट केले. कुलाब्याचे आमदार राज पुरोहीत यांच्या प्रयत्नाने  या दोघांचा पक्ष प्रवेश होत आहे असेही आमदार आशिष शेलार यांनी नमूद केले.

राष्ट्रवादीचे उत्तर मध्य जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष आणि आय लव बांद्रा आणि भामला फाऊंडेशन या माध्यमातून आरोग्य आणि शहरातल्या विविध विषयांवर काम करणारे आसिफ भामला यांनीही पक्षप्रवेश केला. राष्ट्रवादी पक्षात विद्यार्थी चळवळीपासून मी काम करत असून जिल्हाध्यक्ष पदावर सध्या कार्यरत होतो. या सगळ्याबाबत वरिष्ठांशी बोलूनही याची दखल घेतली नाही आणि काम करण्याची स्वातंत्र्य पक्षात उरले नाही म्हणून मी राष्ट्रवादी सोडून भाजपात प्रवेश करत आहे. अल्पसंख्यांक समाजासाठी भाजप चांगले काम करत असून शिक्षण, रोजगार आणि या समाजाला एकूणच न्याय देण्याची भूमिका या देशातील आणि राज्यातील सरकारने घेतली आहे त्यामुळे या पक्षात प्रवेश करण्याचा मी निर्णय घेतला. पारदर्शी कारभार हा भाजपाचा अजेंडा असून  अल्पसंख्यांक समाजाला भाजपा न्याय देऊ शकेल, मी माझ्या अल्पसंख्यांक समाजातील बांधवांनाही आवाहन करतो की या पक्षाशी जोडले जा, असे सांगत आसिफ भामला यांनी पक्षप्रवेश केला. विद्यार्थी सेनेत आणि युवासेनेत महाराष्ट्राच्या कोअर कमिटीत काम करणारे आणि कुर्ला विभागात काम करणारे स्वप्निल चंद्रकांत येरूणकर तसेच सेना नगरसेविका लिना शुक्ला यांच्यासाठी काम करणाऱे प्रशांत रेळे यांनी भाजपात प्रवेश केला. मंत्री विनोद तावडे यांच्या उपस्थितीत हे पक्षप्रवेश करण्यात आले तर यावेळी आमदार राज पुरोहीत, आमदार मनिषा चौधरी, प्रदेश मुख्य प्रवक्ते माधव भांडारी आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Current day month [email protected] *