मंगेश पाडगावकर यांच्या स्मृती जतन करत एक ग्रंथालय सुरू करा – अॅड आशिष शेलार

कविवर्य मंगेश पाडगावकर यांच्या आठवणीने संगीतकार यशवंत देव झाले भाऊक

मंगेश पाडगावकर यांच्या स्मृती जतन करत एक ग्रंथालय सुरू करा

– मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार अॅड आशिष शेलार

सायन येथे महाराष्ट्रभूषण मंगेश पाडगावकर यांच्या स्मृतीशिल्प आणि चौकाचे अनावरण

 

मुंबई दि. ४

४० वर्षांहून अधिक काळ ज्या सायन परिसरात  पद्मभूषण आणि महाराष्ट्रभूषण मंगेश पाडगावकर यांचे वास्तव्य होते. त्याच सायन मधील एका चौकाला कविवर्य मंगेश पाडगावकर यांचे नाव देत त्यांचे एक देखणे स्मृतीशिल्प मुंबई महापालिकेतर्फे उभारण्यात आले आहे. या स्मृतीशिल्पावरील  पडदा बाजूला करतानाच संगीतकार यशवंत देव भाऊक झाले आणि पाडगावकरांच्या आठवणींचे अश्रू त्यांच्या डोळ्यांत तरळले. आज सकाळी झालेल्या या छोटेखानी कार्यक्रमात चौकाचे अनावरण करताना मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार अॅड आशिष शेलार यांनी कविवर्य मंगेश पाडगावकर यांच्या नावाने सायन परिसरात ग्रंथालय सुरू करा अशी सुचना  स्थानिकांना केली.

 

भाजपा नगरसेविका आणि महिला व बालकल्याण समिती अध्यक्षा राजेश्री राजेश शिरवडकर यांच्यासह पाडगावकर कुटूंबियांच्या प्रयत्नाने सायन येथील जे. आर. मेहता उद्याना समोरील चौकाला कविवर्य मंगेश पाडगावकर यांचे नाव देण्यात आले असून मुंबई महापालिकेच्या निधीतून या चौकात पाडगावकरांचे स्मृतीशिल्प उभारण्यात आले आहे. याच परिसरात कविवर्य मंगेश पाडगावकर यांचे निवासस्थान असून त्यांनी याच घरातून दर्जेदार लेखन केले. आज या स्मृतीशिल्पाचे अनावरण संगीतकार यशवंत देव आणि मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार अॅड आशिष शेलार यांच्या हस्ते झाले. अनावरणा नंतर उपस्थितांशी संवाद साधण्यासाठी यशवंत देव यांनी माईक हातात घेताच त्यांच्या डोळ्यात पटकन पाणी आले, कंठ दाटून आला आणि मला ही पाडगावकरांना भेटायला जायला हवे असे काहीसे ते पटकन पुटपुटून गेले. त्यानंतर क्षणात त्यांनी स्वतःला सावरले, पाडगावकरांच्या आठवणी सांगता सांगता भूतकाळात रमले आणि स्वतःच्या वात्रटिका ऐकवून उपस्थितांना हसवून सोडले. मंगेश पाडगावकर यांनी एवढ्या प्रचंड ताकदीची कविता लिहिल्या नंतर वात्रटिका का लिहिल्या असा प्रश्न अनेकांना पडतो पण ज्याच्यात हिंमत असते आणि धाडस असते तोच वात्रटिका लिहितो. पाडगावकर जसे सुचायचे तसे लिहायचे, असे सांगता सांगता संवादाला पूर्ण विराम देताना पुन्हा यशवंत देव यांच्या डोळ्याच्या कडा ओल्या झाल्या आणि सकाळची उन्हे डोक्यावर आली असतानाही गजबजलेल्या शहरातला हा छोटासा चौक हळवा होऊन गेला. उदघाटक म्हणून बोलताना मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार अॅड आशिष शेलार म्हणाले की, एकीकडे पुतळे गायब करून, तोडून विघटनवादी शक्ती काम करत आहेत, पण त्याचवेळी आम्ही अस्सल स्मृती जपण्याचे काम करत आहोत. कारण विचारांशी विचारांनी लढायला हवे. काहीही झाले तरी या जन्मावर शतदा प्रेम करायला हवे हे पाडगावकरांनी शिकवले आहे. मंगेश पाडगावकर यांनी मराठीत अजरामर कविता लिहिल्याच पण त्याच सोबतच पवित्र बायबल चा मराठी अनुवाद केला. कबीर आणि सुरदासाच्या रचना मराठीत आणल्या हे काम सुद्धा मोठे आहे. मराठीवर प्रेम करता करता मंगेश पाडगावकर यांनी अन्य भाषेतील दर्जेदार साहित्य मराठी वाचकांना उपलब्ध करून दिले. आपल्या भाषेवर प्रेम करणे म्हणजे अन्य भाषांच्या बाबतीत विध्वंसक भूमिका घेणे होत नाही हे सुद्धा पाडगावकरांनीच शिवकले आहे. दुर्दैवाने अशी काही लोकं भाषेच्या नावावर स्वतःचा स्वार्थ साधत आहेत आणि विघटनवादी भूमिका घेता आहेत त्यांच्या विरोधात कायदा आपले काम करेलच पण या विघटनवादी आणि विषमतावाद्यांच्या विरोधात मराठी माणसाने उभे राहणे गरजेचे आहे असे आवाहन त्यांनी केले. हे स्मृतीशिल्प उभारण्यास पुढाकार घेणाऱ्या राजेश्री शिरवडकर आणि राजेश शिरवडकर यांचे अभिनंदन करत पाडगावकरांसहीत मराठीतील दर्जेदार पुस्तके उपलब्ध करून देणारे एखादे ग्रंथालयही या भागात सुरू करा अशी सुचना आमदार अॅड आशिष शेलार यांनी केली. कार्यक्रमाला महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष प्रसाद लाड यांच्यासह डॉ. अजीत पाडगावकर आणि पाडगावकर कुटुंबीय आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Current day month [email protected] *